Home / Motivation / पंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल!

पंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल!

आयुष्य पंक्चर व्हायची वेळ आली की, बाई त्यात हवा भरत असते.. फाटक्या संसाराला ती ठिगळं लावून सजवत असते.. बाई कोणत्याही क्षेत्रात कमी नाही.. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती नेटाने प्रपंजा करत असते.. अश्याच एका बाईच्या जिद्दीची ही गोष्ट… शेवटी वाचा त्यांच वाक्य..

तिऱ्हे, तालुका उत्तर सोलापूर येथील या आहेत वनिता खराडे.. अगदी सायकलीपासून ते मोठ्या जेसीबींची पंक्चर देखील त्या अगदी कसोशीने काढतात.. शिक्षण अवघं सहावी.. हक्काची गुंठा जमीन नाही.. नवरा एमआयडीसीत कामाला.. मात्र त्यात संसाराचा गाडा चालत नव्हता.. नवऱ्याच्या अंगात पंक्चर काढायची कला होतीच.. वनिता यांनी ती शिकायची ठरवली आणि नवरा बायकोंनी मिळून तिऱ्हे येथे पंक्चरीचं दुकान सुरू करायचा निर्णय घेतला..

दुकान टाकायचं म्हणजे पैसा आला.. पण परिस्थिती पाहून बँकेने दारात उभा राहू दिलं नाही, तेव्हा खाजगी सावकाराकडून पैसे काढून त्यांनी दुकान सुरू केलं.. आणि भाकरी थापणाऱ्या हातात रॉड आणि टॉमी आला.. पांढऱ्या पीठाने मळलेले हात रोज काळ्या ग्रेसने मळू लागले..

लोकं नावं ठेवू लागली. ‘बाईने असं वागणं बरं नव्ह’ अशा शब्दात बोलू लागली.. तेव्हा त्यांचा बाप पुढे आला.. पोरीमागे उभा राहिला.. “कष्ट करायला लाजू नको पोरी..” या शब्दात त्यांनी तिला धीर दिला.. मग वनीताजींनी कधीच मागे फिरून पाहिले नाही..

वडील बब्रुवाहन गणपत जाधव यांना जेव्हा समजले की, आपली मुलगी हे काम तिच्या पतीकडून शिकत आहे, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आनंदाने होकार दिला. ‘कष्टाचे काम करायला लाजू नको पोरी, हा मंत्रच दिला. मात्र इतर पाहुणे व लोक हे नावे ठेवत होते. मात्र वनितातार्इंनी निर्धार पक्का ठेवला व आपले काम शिकत गेल्या. आज पती व पत्नी दोघेच हा व्यवसाय करीत आहेत. पती रामचंद्र काही कामानिमित्त दुकानात नसले तरी त्या एकट्याच दुकान सांभाळतात.

आता त्यांनी दुकानासाठी स्वतःची मोठी जागा विकत घेतलेय.. आणि संपूर्ण साधनसामुग्रीसह व्यवसाय मोठा केलाय.. त्यांच्याकडे पंक्चरिसोबत वशिंग सेंटर,लाईट गेल्यास जनरेटर, आणि वाहनांचे स्पेअर स्पार्ट्स आहेत.. वनीताजींनी आपल्या कष्टाच्या हाताने ही अवजड कामे सोपी केली आहेत..

त्यांचा मुलगाही आता मोठा झालाय.. त्यालाही त्यांनी हाच व्यवसाय शिकवलाय.. “मी शिकले नाही म्हणून काय झालं, माझ्या पोटच्या भुकेनं मला हा व्यवसाय करायला भाग पाडलं.. मी जिद्द सोडली नाही, बायकांमध्ये खूप जिद्ध असते, फक्त गडीमाणसांनी त्यांना बाहेर पडू द्यावं.. त्या कशातच कमी नसतात.. असं जगण्याचं तत्वज्ञानही त्या आपल्या अनुभवातून मांडतात..

वनिताताई महिलांसाठी स्पिरिट आहेत.. परंपरेने पुरुषी असलेला व्यवसाय करून त्यांनी नवी वाट धुंडाळली आहे.. आपल्या समाजात बायकांनी असं काही करणं म्हणजे, जातीला न शोभणारी गोष्ट मानली जाते, पण भुकेपुढे जात-धर्म गळून पडतात हे त्यांनी सिद्ध केलंय.. भूक ही जगातली सर्वोत्तम जात असल्याचंही त्या सांगतात.. वनिता ताईंच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम…

मी शिकले नाही, म्हणून काय झाले, पण जिद्द सोडली नाही. आपल्या कष्टाने आपण कोणताही धंदा यशस्वी करू शकतो. मी, माझ्या या धंद्यावर समाधानी आहे. महिलांनी न लाजता, न घाबरता पुढे यायला पाहिजे.
– वनिता खराडे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!